श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात भारताचे चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे.


महाराष्ट्राच्या वीरपुत्रावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचं पार्थिव भंडारा जिल्ह्यातल्या पवनी या त्यांच्या मूळगावी आणलं जाणार आहे.

दुर्देव म्हणजे शहीद मोहरकर यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडिल असा परिवार आहे.



शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचा अल्पपरिचय

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे 36 वर्षांचे होते. ते मूळचे भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील पवनी शहरातील. बारावीनंतर त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. मात्र देशसेवेचा ध्यास मनाशी बाळगलेल्या प्रफुल्ल यांनी NDA मध्ये प्रवेश मिळवला.

आठ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पदोन्नती होऊन प्रफुल्ल मोहरकर मेजर पदावर पोहोचले.

चार वर्षांपूर्वी प्रफुल्ल यांचं अवोली यांच्याशी लग्न झालं होतं. प्रफुल्ल यांचे वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत, आई शिक्षिका आहे. लहान भाऊ परेश हा पुण्यात नोकरी करतो.

जुनोना या गावात प्रफुल्ल यांचं प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक आणि त्यापुढील सर्व शिक्षण बाहेर झालं.

मरण प्रत्येकालाच येतं, मात्र देशासाठी दर जीव गेला तर अभिमानच वाटेल, असं कायम सांगणाऱ्या प्रफुल्ल मोहरकर हे देशासाठी लढता लढता शहीद झाले.



चार भारतीय सैनिक शहीद

शनिवारी (24 डिसेंबर) दुपारी पाककडून काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे शहीद झाले आहेत. पंजाबच्या अमृतसरमधील लान्स नायक गुरमैल सिंग, आणि  हरयाणातील करनाल जिल्ह्यातील शिपाई परगत सिंग हे दोन जवानही शहीद झाले आहेत, तसंच आणखी एका जवानालाही वीरमरण आलं आहे, मात्र त्याचं नाव कळू शकलेलं नाही.

या हल्ल्यानंतर चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला चढवला. दरम्यान पाकच्या या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.