खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एखादा अपघात झाल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर येताच क्षणी एक्सप्रेसलगत असलेले ग्रुपमधील सदस्य तातडीने घटनास्थळी धाव घेतात आणि अपघातग्रस्तांना वाचविण्याची मोहीम सुरु होते. अपघाग्रस्तांच्या याच मोहिमेतून आतापर्यंत किमान सातशे पेक्षा अधिक प्रवाशांना या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला आहे.


त्यातच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असून दररोज लाखो प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. पण एक्स्प्रेसवेवर वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होता. अनेकांना याच अपघाताची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर मिळताच ग्रुपचे सदस्य तात्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि अपघातग्रस्तांना मदतीचा हात देतात. हा ग्रुप रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील काही मित्रांनी सुरु केला आहे. 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' या नावाने हा व्हॉट्सअप ग्रुप सुरु करण्यात आला आहे.

खोपोली येथे राहणाऱ्या गुरुनाथ साठेलकर यांनी 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' हा व्हॉट्सअप ग्रुप गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु केला होता. ग्रुपवर एखाद्या अपघाताची माहिती मिळताच गुरुनाथ हे  तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतीचा हात देत असत. कधी, अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे तर कधी मृतदेह बाहेर काढण्याचंही काम ते करत असत. याचवेळी त्यांचे काही मित्र देखील त्यांना या कामात मदत करू लागले आणि बघताबघता व्हॉट्सअपचा हा ग्रुप नावाप्रमाणेच 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' धावू लागला.

फक्त मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातग्रस्तांना मदत करणं ऐवढ्याच पुरता मर्यादित न राहता हा ग्रुप आता कधी दरीत कोसळलेल्या पर्यटकांना बाहेर काढणं, तर कधी धरणात, धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पर्यटकांचे मृतदेह शोधण्यासाठी देखील प्रशासनाला मदत करतं.

या ग्रुपमध्ये डॉक्टर, पोलीस, व्यावसायिक, पत्रकार समाजसेवक आणि स्थानिकांचाही समावेश आहे. या ग्रुपमध्ये 203 सदस्य आहेत. त्यांच्याच मदतीनं आतापर्यंत 700 पेक्षा अधिक जणांना जीवदान मिळालं आहे.