Sadabhau Khot Exclusive : नुकतीच राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे. तोच आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये भाजपचे 5 तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळं ही निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या पाठींब्यावर मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. नेमका सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला? सदाभाऊ खोत यांची पुढची वाटचाल कशी असणार याबाबत एबीपी माझा डीजिटलनं खुद्द सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडलेत. शेतकऱ्यांसाठी कायम मैदानात राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नेमकं ते काय म्हणालेत ते पाहुयात....


शेतकऱ्यांसाठी कायम लढणार


विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, बुधुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. भाजपनं मला का उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास लावले ते माहित नाही. त्यांची पुढची काही गणित असतील असे सदाभाऊ म्हणाले. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. चळवळ सोडून मी लांब जावू शकत नाही. चळवळ आपल्या रक्तात आहे. शेतकऱ्यांच्यासाठी कायम काम करत राहणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. सहावा उमेदवार निवडून येणं शक्य नव्हते. पीक कर्ज माफ केले. माझ्या मंत्रीपदाच्या काळात दुधाला अनुदान देण्याचं काम केले. अपघातानं राजकारणात मी आलो आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या पटलावर न्यायचे होते त्या पटलावर नेले. रस्त्यावरची लढाई विधानभवनाच्या सभागृहात मांडली. बांधावरचा शेतकरी, मी मंत्रालयाच्या बांधावर आणला. यापुढेही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे खोत यांनी सांगितलं. 




एकलव्याप्रमाण फडणवीस यांच्यासोबत राहणार


मी ज्या ठिकाणी होतो, त्याठिकाणी एकनिष्ठ काम केलं आहे. मी शरद जोशी यांच्याबरोबर होतो, त्यांच्याबरोबर एकनिष्ठेनं काम केलं. आज मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत प्रामाणिक राहणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. एकलव्याप्रमाणे मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहणार असल्याचा खुलासा यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला. मी त्यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. माझ्या रक्तात दरबारी राजकारण नाही. मी मैदानावरचा सैनिक आहे. सामान्य माणसांसाठी मी राजकारणात पाऊल ठेवल्याचं खोत यांनी सांगितले.


भाजपकडून कोणतही आश्वासन नाही


पदाचा प्रवास हा अपेक्षा न संपणारा आहे. मला भाजपकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन मिळाले नाही. मी लढत राहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. मात्र, माझ्या मंत्रीपदाच्या काळात मी विविध कामं केली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे खोत यांनी सांगितले. या काळात मी धोरणावर काम केले आहे. महापुरातले निकष बदलण्याचं काम केलं. माझ्या काळात मागेल त्याला शेततळं दिले, मागेल त्याला ड्रीप दिले असल्याचे खोत म्हणाले. कोरोनाच्या काळात दुधाचे, कांद्याचे आंदोलन केल्याचे खोत यांनी सांगितले. मंत्रीपदाच्या काळात मी धोरणावर कामं केले. ऊस परिषद घेऊन साखरेचा हमीभाव मागून घेतला. एपआरपीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. बियाणे हब तयार करण्याची मागणी फडणवीस सरकारनं मंजूर केली होती. मात्र, ठाकरे सरकारनं पुढे काही केल नसल्याचे खोत म्हणाले.  




दिल्ली दरबारी मांडलेलं प्रश्न


मी दिल्ली दरबारी देखील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडल्याचे खोत यांनी सांगितले. उसाला एकरकमी एफआरपी, कांद्याचा प्रश्न, निर्यात शूल्क आठ टक्यावरुन शून्य टक्के आणले, देशांतर्गत कांदा वाहतुकीला अनुदान दिले, सोयापेंड आयातीवर निर्बंध आणायले लावले, निर्यातील अनुदान देण्यास लावले, हे प्रश्न दिल्ली दरबारी मांडल्याचं खोत यांनी सांगितले.


'या' शेतकरी प्रश्नावर लढा उभारणार


पुढच्या काळात अतिरीक्त उसाचा प्रश्न, कांद्याच्या दरांचा प्रश्न, बियाणांचा प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचा लढा उभारणार असल्याची माहिती खोत यांनी दिली. सामान्य माणसांचे प्रश्न कायम मांडत राहणार आहे. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. चळवळ माझ्या रक्तात असल्याचं खोत यांनी सांगितलं. शेतकरी प्रश्नांसाठी मी कायम शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यास सकारात्मक असल्याचंही खोतांनी सांगितलं. 


महत्वाच्या बातम्या: