Beed Loksabha : भाजपकडून बीड (Beed) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र, अजूनही समोरून महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) उमेदवार निश्चित झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. ज्योती मेटे या दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज किंवा उद्या त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


दरम्यान, बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात तुल्यबळ चेहरा देण्यासाठी शरद पवार आग्रही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन ही लढत तुल्यबळ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळावी अशी ज्योती मेटे यांनी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, ज्योती मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रवेशाबाबत अजूनही चर्चा सुरूच असल्याचे म्हटले आहे. ही चर्चा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी होत असल्याची माहिती ज्योती मेटे यांनी एबीपी माझाला दिली आहे. 


बीडमध्ये ज्योती मेटे यांच्यासह बजरंग सोनवणे इच्छुक


दुसरीकडे, अजूनही बीड लोकसभेमध्ये लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत निश्चित झालेलं नाही. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघांमधून शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांच्यासह बजरंग सोनवणे इच्छुक आहेत. सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांना बीडमध्ये तगडा झटका बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे ते सुद्धा या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. 


दरम्यान, बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे यांच्या उमेदवारीवर शरद पवार गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं नसलं, तरी ज्योती मेटे या रिंगणात उतरल्यास पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करत असताना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्योती मेटे या रिंगणात उतरल्यास ही लढत आणखी तुल्यबळ होऊ शकते. विनायक मेटे यांनी प्रथम मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम या संघटनेचे प्राबल्य सुद्धा या जिल्ह्यामध्ये महत्त्वपूर्ण असल्याने लढत निश्चितच एकतर्फी न होता तुल्यबळ होईल, अशी चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या