Mcoca Act :  सध्या राजकारण्यांकडून मोक्का लावा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय..गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो. मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते.  पण मोक्का नेमकं आहे तरी काय ? तो कुणावर आणि  का लावला जातो? मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय? अशा एकंदरीत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात... 


राज्य सरकारने मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय. याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय. मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केलाय.. मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो. 


मोक्का कधी  लावला जातो?


गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 


कोणावर मोक्काची कारवाई होते ?


हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.


 मोक्का लावण्याची प्रक्रिया काय? 


आता ही मोक्का लावण्याची प्रक्रिया काय? क्राईम DCP अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी अवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असे डीसीपी अमोल झेंडे म्हणाले. 



मोक्का लागल्यावर शिक्षा काय मिळते ?


मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.


आता गुन्हीगारी विश्वात राज्यातली काही मेट्रो शहरांचा उल्लेख कायम होत असतो. मुंबई पुणेसारख्या शहरांची नावं तुम्ही हमखास ऐकली असणार. त्यातल्या त्यात पुण्याबाबत बोलायचं झाल्यास पुण्यात मागील वर्षात 52 मोक्का कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातही धक्कादायक आकडेवरी ऐकायची असेल तर नवीन वर्षाचा पहिला महिना संपायच्या आधीच पुण्यात सात मोक्का कारवाया करण्यात आल्या आहे. पुण्यात कोयता गॅंगने तर धुमाकूळ घातला आहेत... मात्र यावर्षात पुण्यात या गॅंगमधील अनेकांवर मोक्का कारवाई होण्याची शक्यता आहे... त्यामुळे जेवढी शहरं वाढत जात आहेत... विकास होतोय.. त्याबरोबरत गुन्हेगारीदेखील वाढत आहे... त्यामुळे यापुढे गुन्हेगारी रोखण्याचं गृहमंत्र्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे.