सिंधुदुर्ग : भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची खासदारपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी भाजपच्या प्रदेश प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या राणेंना भाजपने आपल्या कोट्यातून खासदारकी देऊ केली. त्यामुळे सध्या तरी नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपचे खासदार आहेत.

स्वाभिमान पक्षाच्या विश्वासयात्रे दरम्यान राणेंकडून सतत भाजप सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे पक्षातूनच आता राणेंबाबत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. भाजपमधून राणेविरोधी सूर उमटतानाच त्यांची भाजपच्या खासदारकीवरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपने केली आहे.

नारायण राणेंबाबत भाजप काय निर्णय घेणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.