नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करुन त्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बसवण्यात आले आहे. तर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून रामास्वामी एन. हे काम पाहणार आहेत.


चांगलं काम करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका सुरु झाली. त्यानंतर तुकाराम मुंढेंची बदली म्हणजे मुख्यमंत्री राजकारण्यांच्या दबावापुढे नमल्याचं लक्षण आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.

एबीपी माझाने वेबसाईट आणि ट्विटर हँडलवरुन पोल घेतला. यामध्ये नेटिझन्सचं याबाबत काय मत आहे, हे जाणून घेतलं. "नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस राजकारण्यांच्या दबावापुढे नमल्याचं लक्षण आहे का?", असा प्रश्न एबीपी माझाने विचारला. यामध्ये नेटिझन्सने भरभरुन प्रतिसाद दिला.

ट्विटरवरील पोल :

"नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस राजकारण्यांच्या दबावापुढे नमल्याचं लक्षण आहे का?" या प्रश्नावर ट्विटरवर 24 तासात 549 यूझर्सनी मत नोंदवलं. यापैकी 80 टक्के यूझर्सनी 'होय', तर उर्वरित 20 टक्के यूझर्सनी 'नाही' असे म्हटलं आहे. मात्र, मुख्यमंत्री राजकीय नेत्यांपुढे झुकले असल्याचे मत यूझर्सचे असल्याचे दिसते.

https://twitter.com/abpmajhatv/status/845485367621042177

वेबसाईटवरील पोल :

एबीपी माझाच्या वेबसाईटवरही "नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस राजकारण्यांच्या दबावापुढे नमल्याचं लक्षण आहे का?" या प्रश्नावर मतं मागवण्यात आली. वेबसाईटवरील प्रश्नावर 24 तासात 4 हजार 806 जणांनी आपलं मत दिलं. त्यापैकी 81.19 टक्के जणांनी 'होय', तर 18.81 टक्के जणांनी 'नाही' असं मत नोंदवलं.



नवी मुंबईतील राजकीय नेत्यांचा मुंढेंना विरोध

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची बदली टाळली होती. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.

25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर भाजपने ठरावाच्या विरोधात म्हणजेच मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.

महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.

यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.

नवी मुंबईत धडाकेबाज कामगिरी

नवी मुंबईत पाण्याची होत असलेली चोरी थांबवणे, मनपा प्रशासनाला शिस्त लावणे, विविध 23 दाखले मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, कित्येक नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे पाडणे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून सर्वसामान्य नवी मुंबईकरांशी संवाद साधणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करणे, महसुली उत्पन्न वाढविणे, वादग्रस्त टेंडर्स रद्द करून मनपाचे 400 कोटी रुपये वाचविणे अशा एक ना अनेक कामांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे सर्व सामान्य नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते.