Unseasonal Rain : राज्यासह देशात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळत आहे. आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही काही ठिकाणी आज पावसाची रिमझिम पाहायला मिळेल.


पुढील 48 तासात पावसाची शक्यता


देशाच्या विविध भागात पुढील 48 तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे विदर्भात पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुढील 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.


पावसासह गारपीट होण्याचाही अंदाज


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये पुढील 24 तासात गारपिट होण्याचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी


शुक्रवारी राज्याच्या काही भागात गडगडाटी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. या अंदाजानुसार, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहे. मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान पाहायला मिळत आहे. तर दुपारी  अंशतः ढगाळ वातावरण राहील. आज मुंबईत तापमान सुमारे 26-27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आजही मुंबईसह ठाण्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी


आज सकाळीही मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळीही तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. शुक्रवारी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत अवकाळी पाऊस झाला. दक्षिण मुंबई, अंधेरी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि बोरिवलीसह शहरातील अनेक भागात अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


यंदाचा उन्हाळा कसा असेल?


आगामी उष्ण हंगामात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात ही साधारणत: अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये पश्चिम मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पूर्व आणि पूर्व मध्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि काही भागांमध्ये सामान्य तापमान राहिल असा अंदाज आहे.