Ahmednagar To Be Renamed : औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्याच्या निर्णयानंतर आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' (Punyashlok Ahilyadevi Nagar) करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा महापालिकेचा ठराव देखील घेण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे. (Ahmednagar Renamed Decision Municipal Corporation)


मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची  मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' झाल्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतेही कार्यवाहीला सुरवात झाली नव्हती. परंतु, आता प्रत्यक्षात नामांतराच्या कामाला सुरवात झाली असून, महानगरपालिकेने नामांतराचा ठराव मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेला बहुमत ठरावाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता नामांतराचा निर्णयाला आता वेग आला आहे. 


महानगरपालिकेचा ठराव काय आहे?


महानगरपालिकेने घेतलेल्या ठरावात म्हटले आहे की, “सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन प्राप्त प्रस्ताव आणि संदर्भीय शासन पत्रानुसार महानगरपालिकेच्या बहुमताच्या ठरावाची आवश्यकता आहे असे कळविलेले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर महानगरपालिका यांनी प्रस्तावित केलेनुसार अहमदनगर शहराचे नांव "पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर" करणेच्या प्रस्तावास प्रशासक सर्वसाधारण सभा यास मंजूरी देत आहे.”


असा मंजूर झाला ठराव...



  • जिल्हाधिकाऱ्यांकडून नामांतराचा ठराव पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना आले.

  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची महासभा घेतली.

  • सध्या महानगरपालिकेत प्रशासक असून, अतिरिक्त्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्या उपस्थित महासभा झाली.

  • महासभेत अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

  • हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र याबाबत निर्णय घेतील. 


मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नामांतराची केली होती घोषणा 


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे नामांतर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती सोहळ्यात बोलतांना देखील त्यांनी ही विनंती केली होती. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी महानगरपालिकेचा ठराव घेण्यात आला आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारकडून देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या : 


छ. संभाजीनगर नंतर आता अहिल्यानगर... अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा