Weather Update Today : राज्यासह देशात गुलाबी थंडीला (Cold Weather) चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरात वरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत.


राज्यातील आजचं हवामान कसं असेल?


हवामान खात्यानुसार, मंगळवारी 14 नोव्हेंबरला तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


अवकाळी पावसाची हजेरी कायम


भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या किनारपट्टीच्या प्रदेशात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने तामिळनाडू, पुद्दुचेरीसह कराईकलसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या किनारपट्टीच्या भागात आज 14 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता


आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या अनेक किनारी भागात आणि तमिळनाडूच्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागाने रामनाथपुरम, पुदुक्कोट्टई, तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायलादुथुराई, तामिळनाडूमधील कुड्डालोर जिल्ह्यांतील आणि कराईकल भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, शिवगंगा, पेरांबलूर, अरियालूर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यांत आणि पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता


14 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची तर काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील कुड्डालोर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. तिरुपत्तूर, वेल्लोर, रानीपेट, तिरुवल्लूर, चेन्नई, तिरुवन्नमलाई, कल्लाकुरीची, पेरांबलूर, अरियालूर, तिरुचिरापल्ली, पुदुक्कोट्टई, तंजावूर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायिलादुथुराई, तमिळ नाइलाडू जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.