Weather Update Today : देशातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) चांगलाच तडाखा बसला आहे. देशात एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे कडाक्याची थंडी (Winter) पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात अनेक भागात वीकेंडला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये देशात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे.


मुसळधार पावसाने झोडपलं


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजही या भागात दाट ढग दाटून राहतील. डोंगराळ भागात बर्फवृष्टीसह मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पावसामुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू


सध्या सुरू असलेला पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे डोंगरापासून मैदानी भागात थंडीचा कहर झाला आहे. डोंगरावर वादळासोबत मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, तर मैदानी भागात गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पावसामुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे चिनाब नदीचा प्रवाह थांबला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह 500 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. भूस्खलनामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहतूक ठप्पच आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे दिल्लीतील हवामानही सौम्य आहे.


गारपीट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस


उत्तर भारतातील अनेक भागांना रविवारी पावसाने झोडपले. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये गारपीट आणि विजांचा कडकडाटही झाला. उत्तर प्रदेशात वीजेच्या वेगवेगळ्या झटक्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यावरही अवकाळी पावसाचं संकट


देशासह राज्यात आजही वरुणराजा बरसणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली यामुळे हवामानात गारठा पाहायला मिळत आहे.