Weather Update Today : आज देशात सर्वत्र होळीची (Holi) धामधूम पाहायला मिळत आहे. एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होलिका दहनावेळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. 


होळीमध्ये पावसाचा रंग


हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य भारत, हिमालयीन भाग, बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटी वादळासह पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. याभागात आज 26 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ताज्या अपडेटमध्ये पुढील 24 तासात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.


महाराष्ट्रात हवामान कसं असेल?


दरम्यान, 26 ते 29 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 28 आणि 29 मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.


या भागात पावसाची शक्यता


आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, ईशान्य आसाम आणि आसपासच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय आहे. यामुळे हवामानात बदल होताना दिसत आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये एकाकी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


एकीकडे होलिका दहन दुसरीकडे तुफान पाऊस


रविवारी संध्याकाळ नंतर लातूर शहर आणि परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. होलिका दहन ठिकठिकाणी होत असतानाच जोरदार वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली होती. विजेचा गडगडात आणि वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी संध्याकाळी नंतर वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली. तुफान वारा विजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. या पावसामुळे होलिका दहन अनेक ठिकाणी झालं होतं काही ठिकाणी होणार होतं काही काळ व्यतव्य निर्माण केला होता. 


होलिका दहन होत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावलेली अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे. सखल भागामध्ये पाणी साचून होतं. रस्त्यावर पाणी वाहत होतं. हा पाऊस लातूर आणि लातूर ग्रामीणच्या अनेक भागांमध्ये पहावयास मिळाला. काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरांमध्ये ही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडून गेला आहे. लातूर ग्रामीणमधील आंब्याच्या बागेला या पावसामुळे काही प्रमाणात फटका बसला आहे.