पुणे: राज्यभरातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे, आता प्री मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या या भागात पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह या राज्यात पावसाची शक्यता

हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळं देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात देखील पुढील आठवडाभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, 21 व 22 मे रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे केरळ, तसेच महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर, त्याचबरोबर अरबी समुद्रात देखील हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असल्यामुळे सर्व भागातून येत असलेले आर्द्रतायुक्त वारे आणि दुपारपर्यंत उन्हामुळे निर्माण झालेले बाष्प याच्या संयोगातून राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, सिक्किम्, आसाम या राज्यात मुसळधार पाऊस झाला, तर पश्चिम किनापट्टी, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस नोंदविण्यात आला.

राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस राहणार

राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात 20, 21 व 22 मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. 31 मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अशा चौदा जिल्ह्यांत मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

बुलढाण्यात बाणगंगा नदीला पूर

बुलढाणा तालुक्यात काल सायंकाळी (16 मे) मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आलाय. परिणामी धाड व धामणगाव या दोन गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. बानगंगा नदीवरील अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे.  मात्र या पुलाचे काम अपूर्ण असल्याने वळण रस्त्यावरील मातीचा पूल वाहून गेल्याने दोन गावातील संपर्क तुटला आहे. बुलढाणा तालुक्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.

नाशिकच्या पिंपळगाव परिसरातील ढगफटी सदृश पाऊस

नाशिकच्या पिंपळगाव परिसरात सायंकाळच्या (16 मे) सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आलाय. तर अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसाने कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर शंकर ठक्कर या कांदा व्यापाऱ्यांचा शेकडो क्विंटल कांदा अक्षरक्ष: पाण्यावर तरंगत वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदाही मोठ्या प्रमाणावर भिजल्याने कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.