Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांना वळवाच्या पावसाने (Rain Alert)  अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजासह सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडवली असताना दमदार पावसाने (Weather Update) राज्यात मोठी हानी पोहचवली आहे. नाशिकच्या पिंपळगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील बाणगंगा नदीला पावसामुळे अचानक पूर आल्याने दोन गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात विज पडून एका वृद्ध आजीचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement

बाणगंगा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला

बुलढाणा तालुक्यात काल सायंकाळी (16 मे) मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आलाय. परिणामी धाड व धामणगाव या दोन गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. बानगंगा नदीवरील अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे.  मात्र या पुलाचे काम अपूर्ण असल्याने वळण रस्त्यावरील मातीचा पूल वाहून गेल्याने दोन गावातील संपर्क तुटला आहे. बुलढाणा तालुक्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.

नाशिकच्या पिंपळगाव परिसरातील ढगफटी सदृश पाऊस

नाशिकच्या पिंपळगाव परिसरात सायंकाळच्या (16 मे) सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार तडाखा दिल्याने नदी नाल्यांना पूर आलाय. तर अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसाने कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर शंकर ठक्कर या कांदा व्यापाऱ्यांचा शेकडो क्विंटल कांदा अक्षरक्ष: पाण्यावर तरंगत वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदाही मोठ्या प्रमाणावर भिजल्याने कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Continues below advertisement

 इतिहासात प्रथमच विक्रमी  वळवाचा पाऊस

- नाशिकच्या द्राक्ष नगरी , पिंपळगाव बसवंत व वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. इतिहासात प्रथमच विक्रमी पाऊस बरसल्याचे स्थानिकांचे मत आहे. मात्र या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष बागेच्या सूक्ष्म घड निर्मिती प्रक्रियेवर ही या पावसामुळे परिणाम होणार असून याचा द्राक्ष हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच काढणीला आलेल्या कांदा ही पावसात भिजला आहे. तिकडे वडनेरच्या नेत्रावती नदीला पूर आल्याने पिंपळगावलाही पूरस्थिती निर्णम झाली आहे. तर या परिसरातील काही भागात पुरामुळे शेतातील माती वाहून जाण्याची भीती आता व्यक्त केली जात असून एकूणच या पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

वीज पडून जागीच मृत्यू

नायगाव तालुक्यात सायंकाळी  (16 मे) साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. कुंटूर परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस व काही ठिकाणी जोरदार वारा सुटला होता. त्या वाऱ्यांमध्ये सांगवी येथील तरुण चंद्रकांत सुभाष महागावे हे शेताकडून घराकडे येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी देण्यात आले आहेत. सुभाष पाटील महागाव हे त्यांचे वडील होते. त्यांचाही कोरोनामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच वडिलांचे छत्र हरवलेल्या चंद्रकांत महागावे यांच्यावरही निसर्गाने नैसर्गिक परिस्थिती कोपल्यामुळेच विज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा