Heatwaves in Maharashtra : मुंबईसह राज्यात आठवडाभर उष्णतेच्या झळा पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. आठवडाभर हे वातावरण कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


मे महिन्यात तापमान वाढणार


आयएमडीने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता पाहायला मिळणार आहे. दीर्घकाळ उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला हवामान विभागाने दिला आहे. पूर्व भारतात 5 मेपर्यंत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात 6 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उन्हाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. 5 आणि 6 मे रोजी ईशान्य भारतात गडगडाटी वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.






येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होणार


आर्द्रतेचे प्रमाण अजूनही कायम आहे. मुंबईत दिवसा आर्द्रता पातळी 56 टक्के आणि रात्री 67 टक्के नोंदवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चक्रीवादळामुळे उत्तरेकडील हवेचे मुंबईच्या दिशेने होणाऱ्या स्थलांतराला वेग येईल, त्यामुळे तापमानात वाढ होईल. तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.


मुंबईच्या तापमानात चढ-उतार कायम राहणार


पुढील आठवडाभर मुंबईच्या तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 आणि 5 मे रोजी पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल. त्यानंतर तापमानात पुन्हा घट होईल. सलग तीन दिवस उष्णतेच्या लाटेनंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दिवसाच्या तापमानात 4 अंशांनी घट नोंदवण्यात आली. गुरुवारीही कमाल तापमानात 1.1 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. त्याचवेळी किमान तापमान 27 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते ते आता 25.9 अंश सेल्सिअसवर आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Weather : महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज