सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातला वाद सुरुच आहे. सदाभाऊंकडून फारशा अपेक्षा नाहीत, सरकारचा उठसूठ उदोउदो करु नये. सरकारचा आपण ठेका घेतला नाही, अशा शब्दात राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांचा समाचार घेतला.


तुमच्या मर्यादित मंत्रीपदाचा विचार करुन भूमिका घ्या. मर्यादेच्या पुढं जाऊ नका, अशा तिखट शब्दात राजू शेट्टींनी सदाभाऊंवर टीका केली आहे. सांगलीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवादयात्रेच्या संकल्पनेवरही हल्लाबोल केला.

राजू शेट्टी काय म्हणाले?

''सदाभाऊंना मंत्रिमंडळात कमी अधिकार आहेत.


निर्णय प्रक्रियेतही ते नसतात.


कॅबिनेटमध्ये त्यांना बसता येत नाही.


हे ओळखून त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा नाहीत.


सरकारचा उदोउदो करण्याचा आपण ठेका घेतलेला नाही.


सरकारचे प्रश्न सरकार पाहून घेईल. तुम्ही एक सामान्य राज्यमंत्री आहात.


त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, हे आम्ही त्यांना सांगू.


इतर मित्रपक्षही कसे राहतात पाहा.


सदाभाऊ नवखे असल्याने उत्साहाच्या भरात जास्तच कौतुक करत आहेत.


पण योग्य वेळी त्यांना समजावून सांगू,'' असं राजू शेट्टी म्हणाले.


''कर्जमाफी हे शेतकऱ्यांसाठी सलाईन''

कर्जमाफी हे सलाईन आहे. मात्र सलाईन दिल्याने अत्यावस्थ रुग्ण बरा होतो असं नाही. पण सलाईन दिल्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्याचं शरीर किमान प्रतिसाद तरी देतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल आणि पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील तर शेतकऱ्याला कर्जमाफी देणं हा एकमेव उपाय आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.