Water shortage Nanded : मार्च महिन्यातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पोमानाळा येथील ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर टँकर सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अजून तिथे टँकर सुरु झालेले नसताना इतर गावातील पाणी प्रश्न समोर आला आहे.
800 लोकसंख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहिरींनी तळ गाठलाय. थेंबभर पाणी शेंदण्यासाठी विहिरीच्या पाझरातून पाणी येण्याची तासोनतास वाट पाहावी लागत आहे. जाकापूर तांड्यावरील विहिरीनेही तळ गाठला असून विहिरीतील गढूळ पाणी घेण्यासाठीही गर्दी होत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही महिनाभरापूर्वी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती. गावाने टँकरची रितसर मागणीही केली पण अजून एकही टँकर सुरु करण्यात आले नाही. शेतातील विहिरीत किंवा जिथे शेतात बोअरला पाणी आहे तिथून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठीही थेंबभर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थानी केलीये.
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या (Water Crisis) झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. वाड्या - वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळते. शेती पिके पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता आहे . शेतीपिकांची लागवड होते मात्र पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. यंदा तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील लोकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पाणी टंचाईच्या मुद्यावरुन नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. आमच्या भागात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अनेक ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या: