लातूर : दोन दिवसांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीसाठी मांजरा धरणाहून होणारा पाणी पुरवठा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरुन बंद करण्यात आला होता. मात्र, हा पाणीपुरवठा लातूरच्या राजकारण्यांनी पूर्ववत करुन घेतला आहे. परंतु, शनिवारी सकाळी धनेगाव धरणावर बीड येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करून हा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतीसाठी बांधण्यात आलेल्या धरणातून उद्योगासाठी पाणीपुरवठा कसा असा सवाल उपस्थित करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने पाणीप्रश्न पेटला आहे.

केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी एका रात्रीतून जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून लातूर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करून लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळिवले होते. त्यामुळे लातूरसह औसा येथील जवळपास 800 उद्योगधंदे अडचणीत आले होते. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून पालकमंत्री संभाजी पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि रात्रीच  पाणीपुरवठा सुरळीत करून घेतला. शनिवारी सकाळी 10 पर्यंत पाणी सुरळीत पाणीपुरवठाही झाला. मात्र, केज, अंबाजोगाई येथील शेतीचे पाणी बंद करून लातूर एमआयडीसीला पाणीपुरवठा कसा केला जातो म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

बीडच्या क्षेत्रात असणाऱ्या धरणातील पाण्याचा वापर लातूरच्या एमआयडीसीला होतो, हे अन्यायकारक असल्याचे मत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शेतीला नाही तर उद्योगधंद्यासाठीही अशी भूमिका घेऊन शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले आहे.

पाणीप्रश्न पेटला असल्याने सोमवारी बीड, उस्मानाबाद व लातूर येथील जिल्हाअधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्येच योग्य तोडगा निघणार असल्याचे संकेत लातूर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. एकंदरीत धरण मृतसाठ्यात असले तरी राजकीय अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न बीड, लातूर येथील लोकप्रतिनीधींकडून होत आहे. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो किती काळापर्यंत टिकेल याबाबत साशंका आहे.