मुंबई : मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे या टोळीत मुंबई विद्यापीठाचेच कर्मचारी पोलिसांच्या हाती लागले आहेत.

रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमीमध्ये द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या गुणपत्रकेबाबत फिनोलेक्स अकॅडमीच्या व्यवस्थापनाला संशय आला आणि त्यांनी या विद्यार्थ्याचे गुणपत्रक पडताळणीसाठी विद्यापीठाकडे पाठवले. मुंबई विद्यापीठाकडून धक्कादायक उत्तर आले. या विद्यार्थ्याने तयार केलेले मुंबई विद्यापीठाचे हे गुणपत्रक हुबेहूब असलं तरी बनावट असल्याचे समोर आलं.

फिनोलेक्स अकॅडमीने याबाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात नोंदवली आणि यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं खोदायला सुरवात केली. बनावट गुणपत्रक महाविद्यालयाला देणाऱ्या या विद्यार्थ्यापासून सुरु झालेले प्रकरण प्रथम महाविद्यालयाच्या गेटवर काम करणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकापासून थेट मुंबई विद्यापीठाच्या मुंबई  कार्यालयात पोहोचलं.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, हे बनावट गुणपत्रक मुंबई विद्यापीठाच्या मुंबई येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयार केल्याचे समोर आलं.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मग या प्रकरणात मुंबई विद्यापीठातीलच डेटा एन्ट्री ऑपरेटर गोरखनाथ गायकवाडसह एक शिपाई प्रवीण वारीक, डाटा इन्ट्री ऑपरेटर महेश बागवे आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील क्लार्क गणेश गंगाराम मुणगेकर यांच्या मुसक्या आवळल्या. एक लाख 35 हजार रुपयांच्या बदल्यात मुंबई विद्यापीठातील या मंडळींनी विद्यार्थ्याला गणित आणि बेसिक इलेक्ट्रिकल्स या दोन विषयात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक दिल्याचे उघड झाले.

या विद्यार्थ्याने महाविद्यालयाला फसवण्याचा प्रयत्न केला, हे या प्रकरणामुळे उघड झालेच. मात्र, त्याचसोबत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासाने मुंबई विद्यापीठातील बनावट गुणपत्रक तयार करणाऱ्या टोळीचीही भांडाफोड झाली.