हिंगोली : हिंगोली शहरासह जिल्हाभरात यावर्षी काही महिन्यांपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईमुळे काहीजण शेत शिवारात भटकंती करून तर काहीजण खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्यांकडून पाणी विकत घेऊन तहान भागवत आहे.

माणसांसोबत जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न जिल्ह्यात गंभीर बनला आहे.  जिल्ह्यातील पाण्याचे प्रमुख साठे असलेले सिद्धेश्वर, ईसापूर, यलदरी या प्रमुख धरणांनी काही महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. तर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली कयाधु नदी देखील उन्हाळा लागण्यापूर्वीच कोरडी पडली आहे. त्यामुळे लवकरच जमिनीतील पाणीपातळी खालावली असून विहीर, बोर, हातपंपांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हिंगोली शहरासह जिल्हाभरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

VIDEO | पाण्यासाठी जीवघेणी वणवण, नाशिकच्या बर्डेवाडीतील विदारक अवस्था | नाशिक | एबीपी माझा


जिल्ह्यात सध्यस्थितीत 38 टँकर तहान भागवत आहेत. सेनगाव,  कळमनुरी तालुक्यात 10 टँकर, हिंगोली तालुक्यात 9, औंढा नागनाथ तालुक्यात 5 , वसमत तालुक्यात 4 असे टँकर चालू आहेत. औंढा आणि वसमत तालुक्यातील अनेक गावांना यापूर्वी सिध्देश्वर, एलदरी, धरणांच्या कॅनॉलने पाणी सोडले जायचे. परंतु धरणाची पाणी पातळी खालावल्याने कॅनॉलने पाणी सोडले जात नाही. कधी ज्या गावात टँकरची आवश्यकता नव्हती ती गावं आता पाण्याचे टँकर मागू लागले आहेत.

सेनगाव तालुक्यातील खेरखेडा, पाणकनेरगाव, काहकार यासह अनेक गावात सध्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट  करावी लागत आहे.  ज्या गावात पाण्याची सोय नाही अशा  गावात टँकर सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.