Maharashtra Politics : अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, असं आवाहन काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे. तसेच, काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला (Sagar Bungalow) कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चिमटा काढला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "सध्या राज्यात जे घटतंय ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावरुन चिमटा काढला आहे. सागर बंगला कदाचित वॉशिंग मिशनसारखं काम करतो, असं ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ : सागर बंगला वॉशिंग मशिनच काम करतो : बाळासाहेब थोरात
रश्मी शुक्ला, मोहित कंबोज यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज हे देखील फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणी आज (गुरुवारी) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेते मोहित कंबोज देखिल फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या काळात चौकशी सुरु झाली आणि रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आता सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
फोन टॅपिंग प्रकरण नेमकं काय?
आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना 2015 ते 2019 या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंग प्रकरणात 2021 पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचा संदर्भ देत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील 9 राजकीय नेत्यांचे फोन विविध नावाने टॅप केल्याचा रश्मी शुक्लांवर आरोप आहे. या प्रकरणात 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यान्वये मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.