वाशिम : वाशिमचा जवान मेघालयात शहीद झाला नसून त्याची हत्या झाली आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुनील धोपे यांची हत्या केल्याचा दावा धोपे कुटुंबाने केला आहे.


वाशिमचा सुनील धोपे हा जवान मेघालयातील शिलाँगमध्ये बीएसएफमध्ये कर्तव्य बजावत होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुनील शहीद झाल्याची आधी बातमी आली, मात्र त्यानंतर सुनील यांचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आल्याचं जिल्हा प्रशासनाने कळवलं.

महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी फोनवर बोलताना सुनीलने आपल्याला चार वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. आपल्या जीवाला धोका असल्याचंही सुनील धोपेंनी सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. संभाषणाची ऑडिओ क्लिपही नातेवाईकांकडे आहे.

सुनील धोपे यांचं नेमकं काय झालं, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशिममधील कारंजातील मूळगावी सुनील धोपेंचं पार्थिव आणलं जाणार आहे. मात्र दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सुनील धोपे यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.