Paani Foundation : 'सत्यमेव जयते'च्या 2022 सालच्या फार्मर कपवर अमरावतीच्या वाठोडा गावाने आपलं नाव कोरलंय. तर द्वितीय क्रमांक औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने तर तृतीय क्रमांक जळगाव आणि हिंगोली जिल्ह्याने पटकावला आहे. सिनेअभिनेते आमिर खान आणि किरण राव यांच्या पानी फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील तालुक्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अबालवृद्धांनी घाम गाळून गावागावात पाणी जिरवलं. परिणामी गावं सुजलाम सुफलाम होताना पाहायला मिळतायेत. यापुढं जाऊन विषमुक्त शेतीचे धडे ही दिले जात असल्यानं पाणी फाउंडेशनचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. रासायनिक युक्त अन्न खावं लागत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आणि ते प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी विषमुक्त शेती काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमानिमित्त नमूद केलं.


सत्यमेव जयते फार्मर कप 2022चे विजेते कोण ?


प्रथम क्रमांक


परिवर्तन शेतकरी गट, वाठोडा, तालुका - वरुड, जिल्हा - अमरावती


स्वरूप - फार्मर कप आणि 25 लाख रुपये


द्वितीय क्रमांक


चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गोळेगाव, तालुका - खुलताबाद, जिल्हा - औरंगाबाद


स्वरूप - सन्मान चिन्ह आणि 15 लाख रुपये


तृतीय क्रमांक (विभागून)


जय योगेश्वर शेतकरी गट, डांगर बुद्रुक, तालुका - अमळनेर, जिल्हा - जळगाव 


उन्नती शेतकरी गट, वारांगना तर्फे नांदापुर, तालुका - कळमनोरी तालुका, जिल्हा - हिंगोली


स्वरूप - सन्मान चिन्ह आणि 5 लाख रुपये


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषि विभागाचा सन्मान


पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 'सत्यमेव जयते फार्मर कप 2022'च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  कृषि विभागाचा पानी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात सहकार्याबद्दल सन्मान करण्यात आला. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते. कृषि विभागाने पानी फाऊंडेशनच्या स्थापनेपासून विविध उपक्रमात सहकार्य केल्याचे यावेळी आमिर खान यांनी सांगितले.