वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगितलं आहे. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. मात्र ही चौकशी का लागली, हा घटनाक्रम नेमका कसा सुरु झाला हे जाणून घेऊया...  
 
1992-93  मध्ये स्व. पुंडलिकराव गवळी यांनी सहकारी तत्वावर पार्टिकल बोर्डची स्थापना केली. खासदार पुंडलिकराव गवळी हे या कारखान्याचे संचालक अध्यक्ष  होते. पुंडलिकराव गवळी याचं 2001 मध्ये निध झालं. त्यानंतर  खासदार भावना गवळी यांच्या आई शालिनीताई गवळी या कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. मात्र काही कारणाने हा कारखाना बंद झाला आणि 2008 मध्ये बालाजी पार्टिकल बोर्ड अवसायनात निघाला. तर हाच कारखाना 16 ऑगस्ट 2010 मध्ये खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या भावना अॅग्रोटेक-महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेने सात कोटी रुपयांत सहकार आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडून विकत घेतला   मात्र या खरेदी-विक्रीचा व्यवहार संशयास्पद असल्याचा ठपका ठेवत सुभाष देव्हडे यांनी 2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका  दाखल केली होती. त्याचा निकाल प्रलंबित आहे. 


असं असलं तरी या कारखाना विक्री आणि महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटी जन शिक्षण संस्था, भावना पब्लिक स्कूलच्या व्यवहाराबद्दलची तक्रार खऱ्या अर्थाने 21 जून 2021 रोजी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्ते हरीश सारडा यांनी नागपूर खंडपीठात केली. बालाजी पार्टिकल बोर्ड आणि महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना पब्लिक स्कूल यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं. त्या संदर्भात ईडी कार्यालयातही तक्रार दाखल केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. मात्र 16 ऑगस्ट रोजी खासदार भावना गवळी यांनी आपण कुठलाच घोटाळा केला नसल्याचं सांगितलं. पण किरीट सोमय्या यांनी 19 ऑगस्टला वाशिमचा दौरा केला आणि बालाजी पार्टिकल बोर्ड असलेल्या वाशिमच्या देगाव इथे भेट देण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. 


त्यानंतर 30 ऑगस्टला ईडीचं पथक वाशिमच्या देगाव रिसोड आणि विविध संस्थेत दस्तावेजाच्या तपासणीसाठी वाशिमला पोहोचलं आणि भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असलेल्या सईद खान हे ईडीच्या रडारवर आले. भावना अॅग्रो आणि महिला उत्कर्ष  प्रतिष्ठान या संस्थांचं बेकायदेशीर कंपनीमध्ये रुपांतर करत 18 कोटी रुपयांची अनियमितता ईडीला आढळली. यानंतर सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांची संपत्तीही जप्त केली आणि खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावला. मात्र चिकन गुनिया झाल्याचं कारण देत भावना गवळी पहिल्या आणि दुसऱ्या समन्सला उपस्थित राहिल्या नाहीत. पण आता ईडीने तिसऱ्या समन्सला खासदार भावना गवळी यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


ED Summons to Bhavana Gawali : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


'खासदार दाखवा बक्षीस मिळवा'; यवतमाळमध्ये भाजपकडून खासदार भावना गवळी यांचे बॅनर!