वाशिम : एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या, वंशाच्या दिव्याचा अट्टाहास, हुंडाबळी... अशा बातम्या आजही आपल्या आजूबाजूला घडत आहेत. मात्र वाशिममध्ये एका पित्यानं आपल्या मुलीचं छोटसं स्वप्न पूर्ण केलं. कदमांच्या लेकीचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी अख्खं गाव लोटलं होतं.
काजलसाठी 'तो' दिवस स्पेशल होता. कधीकाळी लहानपणी तिनं घोड्यावर बसण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण ते पूर्ण होईल असं वाटत नव्हतं. मात्र काजलच्या वडिलांनी लग्नाआधी मुलाप्रमाणं तिची घोड्यावरुन वरात काढली आणि काजलची स्वप्नपूर्ती झाली.
खरंतर मुलीची घोड्यावरुन मिरवणूक कारंजा गावानं कधी पाहिली नव्हती. त्यामुळे काजलच्या कौतुकाचा सोहळा बघायला अख्खं गाव लोटलं होतं.
गजानन कदम पोलिस दलात एएसआय आहेत. अख्खी हयात त्यांनी मुलींच्या छळाची आणि अन्यायाची प्रकरणं पाहिली. त्यामुळेच घरातील तीनही मुलींना त्यांनी मुलासारखं वागवलं.
मुलगी म्हटलं की तिला धाकात आणि पदराआड ठेवणं, तिचं स्वातंत्र्य केवळ भाषणात ठेवण्याचा आपला 'ट्रेंड' आहे. अजूनही महाराष्ट्रात मुलींना गर्भातच संपवलं जातं. अशा सगळ्या महाटोळांच्या डोळ्यात गजानन कदमांनी अंजन घातलं आहे. त्यामुळे काजलसारखे बाबा सगळ्या मुलींना मिळोत, एवढीच अपेक्षा.