महिलांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली आहे. देशी दारुच्या दुकानातून बाहेर पडणाऱ्या तळीरामांच्या गळ्यात पुष्पमाला घालून त्यांना लाज आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बुलडाणा जिल्हयातल्या धाड गावातील देशी दारुचे दुकान बाहेर काढण्यासाठी गावातील महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप प्रशासनाने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी चक्क दारुच्या दुकानासमोर गांधीगिरी करुन देशी दारुच्या दुकानात जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या मद्यपींच्या गळ्यात फुलांचे हार घातले.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिलांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरील दोन देशी दारुची दुकानं बंद झाली. मात्र धाड गावातील एक दुकान अद्याप सुरु आहे.
परिणामी या ठिकाणी दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली असून प्रमाणाबाहेर गर्दी होत आहे. याचा सर्वाधिक त्रास गावातील महिला, वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना होत आहे. यासंदर्भात गावातील 300 पेक्षा जास्त महिलांनी 1 मे रोजी ग्रामसभेत आग्रही मागणी करत दारुचं दुकान हे गावाबाहेर हटवण्याचा ग्रामसभेचा ठराव घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 15 दिवसाची मुदत दिली. मात्र आजपर्यंत यावर कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर धाड येथील महिलांनी मंगळवारी संध्याकाळी देशी दारुच्या दुकानासमोर जमून दारु पिण्यासाठी येणाऱ्या तळीरामांचा पुष्पहार घालून गांधीगिरी करत 'सत्कार केला'. या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली.