Hasan Mushrif : पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिलेली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं आहे. त्यामुळे मुश्रीफ यांची खदखद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.


कार्यक्रम संपल्यानंतर तत्काळ कोल्हापूरकडे रवाना 


वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर ते तत्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रशासकीय बैठकांचा समावेश नसल्याने पालकमंत्रीपदावरील त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली. जिल्हा लहान असला, तरी शेतीप्रधान जिल्हा असून, उपेक्षित ओळख पुसून विकासासाठी अधिक गती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.






श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला 


पालकमंत्री पदावरील नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, "मी यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे. अजित पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असून, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे." दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीविषयी हसन मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली.त्यांना कफ आणि आवाज बसल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा टू झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले. 


गरीबाला गरीब जिल्हा का दिला?


महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन नाराजीनाट्य सुरू असतानाच यात राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या सुद्धा नावाची भर पडली आहे.माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले, याचा वरिष्ठांना जाब विचारणार असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले आहे. शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी रायगड, दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. हसन मुश्रीफही नाराज आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस वाढत चालली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या