वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी आज वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक तोडगा निघाला आणि पोहरादेवीच्या यात्रेला परवानगी मिळाली. उद्यापासून (2 एप्रिल) प्रशासन, पोलीस बंदोबस्त, वीज-पाणी आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करुन ही यात्रा यशस्वी पार पाडणार असल्याचं महंतांनी माध्यमांना सांगितलं.


वाशिम जिल्हा प्रशासनाने 25 जानेवारी ते 11 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करुन रामनवमी निमित्त होणारी पोहरादेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही यात्रा होऊ शकली नाही. मात्र पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज, बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यात्रेला परवानगी देण्याची विनंती केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात फेरविचार करण्यासाठी 1 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला होता. त्यातच कोरोनामुळे घातलेले निर्बंध राज्य सरकारने हटवल्याने यात्रेला नेमका विरोध का प्रश्न विचारला जात होता. अखेर आज पोहरादेवीचे महंत, बंजारा धर्मगुरु आणि भाजप आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने मोठ्या तयारीने ही यात्रा होणार आहे. 


वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. रामनवमीच्या औचित्यावर संत सेवालाल महाराजांची भव्य यात्रा भरते. पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण बंजारा बांधवांचे दैवत असलेल्या सेवालाल महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविक पोहरादेवी या ठिकाणी दाखल होत असतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.