Amravati News Updates : अमरावतीमध्ये एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. अमरावतीतील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील बी.टेक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अनिकेत अशोक निरगुडवार असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अनिकेतनं फी न भरल्याने महाविद्यालयाने परीक्षेला परवानगी नाकारली आणि पेपर हिसकावून घेतला. त्यामुळे अनिकेतने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी बहिणीला काय म्हणाला अनिकेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या संस्थेतर्फे हे महाविद्यालय चालवले जाते. फी भरण्यासाठी शिक्षक तगादा लावत असून फी भर अन्यथा शिक्षण सोड अशा शब्दात आपला अपमान केला जात असल्याची माहिती अनिकेतने आत्महत्येपूर्वी दिली होती असं अनिकेतच्या बहिणीने सांगितले आहे.
...तर या शिक्षणाचा काय फायदा?
विद्यार्थी शिक्षणासाठी आपले घरदार सोडून दुसऱ्या शहरात जातात, त्या नवीन ठिकाणी शिक्षक आणि मित्र हेच त्यांचे आधार असतात. मात्र इतकी मोठमोठी कॉलेज काढून जर शिक्षक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे छळत असतील तर या शिक्षणाचा काय फायदा? अशा शब्दात मृतक अनिकेतच्या बहिणीने एबीपी माझासोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोलिस काय म्हणतात...
विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार दिली असून त्यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर समोर येईल अशी प्रतिक्रिया बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महाविद्यालय प्रशासनाने आरोप फेटाळले
तर याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी केली असता प्रशासनाने अनिकेतच्या कुटुंबाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यार्थ्याचा पेपर हिसकावून घेतल्याचा आरोप चुकीचा असून त्याला परीक्षा देण्यापासून रोखण्यात आलेले नाही अशी माहिती महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वैशाली देशमुख यांनी दिली.