Wardha Lok Sabha Result 2024 : वर्ध्यात (Wardha) भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची लोकसभा निरीक्षकाकडून तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. वर्ध्यात भाजपच्या (BJP) झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ही चिंतन बैठक होती. पण पराभवाची कारणे शोधताना आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी प्रचार न करता घरी बसून राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या पराभवासाठी जबाबदार ठरविल्याने बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती पुढे आलीय. बैठकीत एकमेकांवर जबाबदारी ढकलत आमदार आणि पदाधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.
भाजपची चिंतन बैठक ठरली वादळी
भाजपच्या बैठकीत बोलण्यासाठी उभ्या झालेल्या आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना बोलू दिले नाही. नेमके पराभवाचे कारण काय? याची कारणमीमांसा या बैठकीत करण्यात आली. बैठकीला नागपूर येथील आमदार तथा वर्धा लोकसभेचे निरीक्षक प्रवीण दटके हे उपस्थित होते. पराभवाबाबत विविध कारणांवर चर्चा करत असताना आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मात्र एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे पराभवाचे खापर फोडताना चांगलीच खडाजंगी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खडाजंगी वाढत असताना निरीक्षकांनी आटोपते घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे दटके यांनी सांगितले आहे.
मविआने रोखली रामदास तडस यांच्या विजयची हॅट्रिक
वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार अमर काळे (Amar Kale) आणि भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) अशी सरळ लढत या मतदारसंघात राहिली आहे. या लढतीत मिळालेल्या निकालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार यांचा दणदणीत विजय झाला आहे.महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली आहे. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली. परिणामी, काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली आणि एकहाती विजय मिळवला.
इतर महत्वाच्या बातम्या