वर्धा: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली तरी आमच्या मुलीला अपूर्ण न्याय मिळाला आहे. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षाच व्हायला हवी होती अशी पीडितेच्या आई-वडिलांनी दिली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, पण आम्हाला हवा असलेला न्याय मिळाला नाही. तरीही न्यायालयाचा आम्ही आदर करतो असंही ते म्हणाले. 


पीडितेच्या आई-वडिलांनी न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आमच्या मुलीच्या हत्येला कारणीभूत असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती. पण त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आमच्या मुलीला अपू्र्ण न्याय मिळाल्याची भावना आहे. या प्रकरणी वरच्या न्यायालयात अपील करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार आहे."


हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरूण प्राध्यापिकेची आरोपी विकेश नगराळे याने जाळून हत्या केली होती. या प्रकरणी पीडित तरुणीच्या मृत्यूला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला 2019 साली अटक करण्यात आली होती. परंतु या दोन वर्षांची अटक या जन्मठेपेमध्ये धरता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकिलांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. पण न्यायालयाने हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर नसल्याचं सांगत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


संबंधित बातमी: