| | |||
कुटुंबातील सदस्यांचे मत विचारात घेवून सर्वसाधारणपणे लहान बाळाचे नामकरण केले जाते. परंतु,देवरी येथील बंग कुंटुंबाने थेट मतदान प्रक्रियेचा आधार घेत बाळाचे नाव ठेवल्याने जिल्हात हा चर्चेचा विषय ठरला आहे. कुटुंबातून बाळाच्या नावासाठी एकाचवेळी यक्ष,युवान, व यौवीक असे तीन पर्याय समोर आल्याने बंग कुटुंबासमोर पेच निर्माण झाला. यातून मार्ग काढण्यासाठी या कुटुंबाने मतदान घेण्याची नामी शक्कल लढवली. यावेळी कौटुंबिक सोहळ्याला निवडणूक कक्षाचे स्वरूप आले होते. बाळाच्या नावासाठी 149 जणांनी मतदान केले. सर्वाधिक ९२ मते ही ‘युवान’ या नावाच्या बाजूने झाल्याने याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या नामकरण सोहळ्याला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही हजेरी लावली होती. देशभरातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, यासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर घडलेलं हे आगळवेगळं नामकरण नक्कीच बोलकं आहे.