मुंबई : भारतात स्वच्छता अभियानाने जोर पकडलेला आहे. शहर आणि गावांमध्ये स्वच्छतागृह बांधली जात आहे. मात्र बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने त्यांचे मोठे हाल होत असल्याचं हम भारतीय पार्टी आणि अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या सर्व्हेतून समोर आलं आहे.


बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करुन द्यावीत आणि स्वच्छतागृह कोठे आहे, हे ठळक अक्षरात लिहावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचं पत्र हम भारतीय पार्टी आणि अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आणि अर्थमंत्र्यांना लिहिलं आहे.

बँका ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करतात. मात्र ग्राहकांना मुलभूत सुविधाही देत नाहीत ही अतिशय निंदनीय बाब आहे. कारण, पेन्शनसाठी तासनतास बँकेत थांबणारे जेष्ठ नागरिक, महिला आणि इतरांना स्वच्छतागृह नसल्यामुळे अनेक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे.



बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. रांगेत थांबलेले ग्राहक आपला नंबर जाईल, या भीतीने हा त्रास असाच सहन करतात. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी बँकांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे.