पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेला बुंदीचा लाडू आता महागणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर तोटा भरून काढण्यासाठी किंमत 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यामुळे हरभरा डाळ , तेल आणि साखरेच्या किंमती वाढणार आहेत. सध्या लाडूचा प्रसाद 5 रुपयाला एक याप्रमाणे भाविकांना देण्यात येतो. मात्र सध्या प्रती लाडू दीड ते दोन रुपयांचा तोटा मंदिर समितीला सोसावा लागत आहे.

वर्षभरात मंदिर समितीकडून जवळपास 50 लाख लाडूंची विक्री करण्यात येते. वाढलेली महागाई आणि नव्याने आलेला जीएसटी यामुळे समितीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने आता मंदिर समितीने या प्रसादाच्या लाडूची किंमत वाढवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

लाडूची किंमत वाढवणं किंवा लाडू दुसऱ्याला बनवायला देणं अशा दोन्ही पद्धतीने विचार सुरु आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे लाडू विक्रीतून मंदिर समितीला तोटा होत असल्याने ना नफा ना तोटा याप्रकारची किंमत ठरवून दर वाढ केली जाईल, असं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विजय देशमुख यांनी ‘माझा’शी बोलताना सांगितलं.

त्यामुळे आता विठुरायाचा प्रसाद खरेदी करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री 2 रुपयांची अतिरिक्त झळ सोसावी लागणार आहे. कारण 5 रुपयांचा लाडू आता 7 रुपयांना होण्याची शक्यता आहे.