शिर्डी : साईचरणी देणगी अर्पण करणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थानने अभिनव योजना सुरु केली आहे. 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्ताला संस्थानच्या वतीने 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं भेट देण्यात येणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातूनही अनेक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करीत शिर्डीत दाखल झाले आहेत. आज सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा  यांची सवाद्य मिरवणूक गुरूस्थानमार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. आजच्या दिवशी गुरूला भगवंत मानून गुरुंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्यासाठी आजचा दिवस असल्याच साई मंदिर पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी सांगितलं.

सकाळी काकड आरतीकरता यावी यासाठी  साईभक्त काल  रात्रीपासूनच दर्शन रांगेत उभे होते. साईबाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प यावेळी अनेक भक्तांनी केल्याचं सांगितलं.

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साई संस्थानच्या वतीने अभिनव योजनेचा आज पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 25 हजार अथवा त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांसाठी संस्थानच्या वतीने आता 20 ग्राम चांदीचे नाणे भेट म्हणू देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात 5 भक्तांना ही नाणी देऊन योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

दरम्यान, तीन दिवसात 4 ते 5 लाख भाविक साईदर्शन घेण्याची शक्यता असून बाबांच्या झोळीतही मोठ्या प्रमाणात दान जमा होणार आहे. आज भाविकांसाठी दर्शनासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार असून अनेक कलावंत आपले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. आज गर्दीचा उच्चांक होणार असल्याने शिर्डीतील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे.