मुंबई : एसटी महामंडळाच्या विठाई बससेवेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या सेवेचं लोकार्पण केलं जाणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे.


पंढरपूर येथे येण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनाने प्रवास करतांना त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामनाही करावा लागतो. मुक्कामाची आणि जेवणाचीही गैरसोय होते. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची समस्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विठाई बस वारकऱ्यांच्या सेवेत सोमवारपासून दाखल होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात 24 डिसेंबर रोजी विठाई एसटी बसचं उद्घाटन होणार आहे.

सुरुवातीला दहा बस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील. दापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. 2x2 पुश बॅक सीट असल्याने राज्यातील वारकऱ्यांचा पंढरपूर तसंच पंढरपूर ते आपल्या गावापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे.

सोबतच प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणं आवश्यक असेल. या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टाळता येणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा भाविकांना पुरवण्यात येईल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लूटही थांबणार आहे.