पंढरपूर : भाजपमधील वाचाळवीरांची तोंडे बंद करण्यासाठी आता मोदींना बांबूचा कारखाना काढावा लागेल, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी त्यांच्या पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल, असे वक्तव्य केले होते. याचाच संदर्भ देत आता भाजपच्या वाचाळवीरांच्या घशात बांबू घालण्यासाठी मोदींना देशात एक बांबूचा कारखाना सुरु करावा लागेल, असा टोमणा संजय राऊत यांनी लगावला. भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष असून त्यांच्या तालुका आणि गावपातळीचे नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत युतीची विधाने करीत असतात, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील बड्या मंडळींनी वेळ मागितली आहे. तसेच काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पंढरपूरच्या महासभेत होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले .
हनुमानाबाबत सुरु असलेल्या वाचाळवीरांच्या वक्तव्याचा समाचार आजच्या सामनामधून घेतला आहे. भाजपने आता राममंदिरावर बोलणे बंद करावे, असा उपरोधिक सल्ला देत यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत, असे सांगितले.