मुंबई : महाराष्ट्रामध्ये मंदिर खुले करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. सरकारने लवकरात लवकर मंदिर खुली करावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.


उत्सवांच्या काळात मंदिर बंद ठेवल्याच्या आरोप करत आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपुरात विविध मंदिरांसमोर राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलने केली. गणेशपेठ परिसरात आगयाराम देवी मंदिराच्या समोर ही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महाआरती केली. आज्ञाराम देवी नागपूरची ग्राम देवी मानली जाते. नवरात्र काळात तर या मंदिरात लाखोंच्या संख्येने नागपुरकर दर्शनासाठी येतात.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी ही धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी करत राज्य सरकार विरोधात आंदोलने सुरु केली आहे.आज विश्व हिंदू परिषदेने नागपुरात एक डझन पेक्षा जास्त मंदिरांच्या समोर घोषणाबाजी करत निषेध आंदोलने केली. प्रत्येक ठिकाणी आंदोलनानंतर रस्त्यावरूनच महाआरती करण्यात आली.


शिर्डीतील साई मंदिर खुले करा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने साई मंदिरासमोर शंखनाद , घंटानाद तसेच ढोल बजाओ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. शिर्डी ग्रामस्थ , व्यवसायिक आणि भाजपच्या वतीने साई मंदीर खुले करण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात आली आहेत. तर भाजप अध्यात्मिक सेलच्या‌ संत - महंतांनाही लक्ष वेधी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता विहिप आणि बजरंग दल मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहे. बार खुले करणा-या सरकारने मंदिर खुले केले नाही तर आघाडी सरकार मधील मंत्र्यांना फिरू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी बोलून दाखवली आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दरवर्षी प्रमाणे आपल्या कार्यालयापासून नवरात्री निमित्त अंबादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात. यावेळी ही हे राणा दांपत्य आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन निघाले. मात्र, यंदा मंदिर बंद असल्याने या दाम्पत्यांनी मंदिराबाहेरच अंबादेवी आणि एकविरा मंदिराचे दर्शन घेतलेयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.या सरकारला दारूच्या दुकानात 400 लोकं चालतात पण मंदिरात नियमांचं पालन करून मंदिरात जाण्यासाठी काय अडचण आहे असा प्रश्न उपस्थित करत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.