सातारा : पुणे अपघातामुळे चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबाचे अनेक कारनामे बाहेर आले आहेत. अग्रवाल कुटुंबाने महाबळेश्वरमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं असून त्यांनी सरकारी जमिनीवर आलिशान पंचतारांकित हॉटेल उभारल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्रवाल कुटुंबाचे महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर हॉटेल असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 


अग्रवाल कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यामुळे प्रशासन आता पुढे काय पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी तीन दिवस मुक्कामी असून माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आदेश दिले आहेत. 


अग्रवाल कुटुंबीयांचं महाबळेश्वर कनेक्शन


पुण्यातील कल्याणी नगर या ठिकाणी अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत पोर्श कार चालवत एका दुचाकीला उडवलं होतं. यात दोघांचा मृत्यु झाल्यानंतर राज्यात आणि देशात एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणानंतर अग्रवाल कुटुंबानं हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक ठिकाणी दबाव तयार केला होता. मात्र या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील एकूण तिघांना अटक‌ करण्यात आली. अल्पवयीन मुलाचे अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा अटक झाली आणि नंतर सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक झाली. आता विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झाले आहे. 


महाबळेश्वरमध्ये अग्रवाल यांनी शासकीय मिळकत भाड्यानं घेवून या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचं पंचातारांकित हॉटेल बांधलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याचं निदर्शनात येत आहे. या बाबत महाबळेश्वर नगरपालिकेत तक्रारी  दाखल करण्यात आली असू यावर अजूनही कारवाई झाली नाही.


या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एक बारही असल्याचे सांगण्यात येते. तसंच स्वत:च्या वापरासाठी दाखवण्यात आलेलं हे हॉटेल पुन्हा दुसऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात आलं आहे. यामुळं ज्या अग्रवाल कुटुंबातील व्यक्तीनं दारु पिऊन दोघांचा जीव घेतला त्या कुटुंबाचा अनाधिकृत बार कसा सुरू आहे असा सवाल महाबळेश्वरमधील नागरिक विचारत आहेत. तसंच शासनाला फसवून बांधण्यात आलेल्या या अनाधिकृत हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, हे हॉटेल तात्काळ सील करुन शासन जमा करण्यात यावं अशी मागणी महाबळेश्वरमधील तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केली आहे


महाबळेश्वर मध्ये लीज नंबर 233 ही विशाल अग्रवाल यांच्या नावे असून त्यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा यात नावं‌ आहेत. या ठिकाणी अनाधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं तक्रारी दाखल असून याबाबत खातरजमा करुन कारवाई करण्यात येईल असं महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितलं.


ही बातमी वाचा: