बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा परळीत जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. मात्र आता त्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली, असे मेसेज व्हायरल होत आहेत.

केवळ बीडच नव्हे, संपूर्ण मराठवाड्यात या विषयाची चर्चा रंगली आहे. या मेसेजसोबत पंकजा मुंडेंचा आणि उद्धव ठाकरेंचा फोटोही व्हायरल होत आहे. शिवाय त्या शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, असंही काही मेसेजमध्ये म्हटलं आहे.

पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्या या फोटोंवरुन विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे एबीपी माझाने या गोष्टीमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ही केवळ अफवा असून कुणीतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले आहेत, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंच्या कार्यालयाने एबीपी माझाला दिलं.



'मातोश्री'वरील भेटीचा हा जुना फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. अशात उद्धव ठाकरेंशी भेट झालेली नाही, असं पंकजा मुंडेंच्या कार्यालयाने स्पष्ट केलं.

त्यामुळे हा मेसेज अफवा असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपला समाधानकारक यश मिळालं असलं तरी, परळी या त्यांच्याच मतदार संघात त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी पराभव स्वीकारत राजीनाम्याचीही घोषणा केली होती.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार!


जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!