या व्हायरल फोटोमध्ये एका घराच्या गेटवर एक बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ''या घरात अत्तापर्यंत तीन वेळा चोरीच्या घटना झाल्या आहेत. तेव्हा आमचे सोने, पैसे सर्व बँकेत आहेत. तरी कृपया घराचे कुलुप, दरवाजा तोडून आपला वेळ वाया घालवू नये,'' असं नमूद करण्यात आलं आहे.
या व्हायरल फोटोची सध्या सोशल मीडियात कमालीची चर्चा सुरु असल्याने, या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी माझाच्या टीमने चंद्रपूर शहरातील सर्व नागरी वस्तींमध्ये असे बॅनर आणखी कुठेकुठे लागले आहेत, याची पडताळणी केली. यावेळी चंद्रपूरच्या राजुरा शहरातील देशपांडेवाडीत अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचं समोर आलं.
देशपांडेवाडीतील नरेंद्र पुराणिक यांच्या घराबाहेर असे फलक लावण्यात आले आहेत. हे बॅनर लावण्या मागचं कारण जाणून घेण्यासाठी नरेंद्र पुराणिक यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी पुराणिक यांनी देशपांडेवाडीत चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याचं सांगितलं.
विशेष म्हणजे, पुराणिक यांच्याच घरी वर्षभरात तीनवेळा चोरीच्या घटना होऊन देखील, पोलीस प्रशासन ढिम्म असल्याचं पुराणिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुराणिक यांनी लावलेल्या या फलकांमुळे सोशल मीडियावर अनेकांची करमणूक होत आहे. पण देशपांडेवाडीतील हतबल नागरिकांचा खदखदणारा असंतोष या फलकाच्या रूपात बाहेर आला आहे.