सोलापूर : अकलूज येथील डॉक्टर तेजस आणि प्रिया  गांधी दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तेजसचे वडिल प्रदीप गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.


अकलूजमधील सिया हॉस्पिटलचे तेजस आणि प्रिती गांधी या दाम्पत्याला 36 गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई येथील एका सीआरपीएफ जवानांच्या पत्नीचे गर्भपात येथे झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासणी केली असता या दाम्पत्यानं आतापर्यंत 36 गर्भपात केल्याची माहिती उघड झाली. डॉक्टर तेजस गांधी यांचे वडील डॉक्टर प्रदीप गांधी यांनाही गर्भपात आणि सोनोग्राफी प्रकरणात काही महिन्यापूर्वी अटक होऊन शिक्षा झाली होती. त्याच प्रकरणात त्यांचे लायसन्सही रद्द झाले होते.

लायसन्स रद्द झाल्यावर प्रदीप गांधींचा मुलगा आणि सुनेनं गर्भपाताचा धंदा सुरु केला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच तातडीने अकलूजच्या हॉस्पिटलमध्ये छापे टाकण्यात आले आले. गर्भपात झालेल्या 36 प्रकरणांपैकी 5 महिलांची सोनोग्राफी याच हॉस्पिटलमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात अजून बरीच स्फोटक माहिती बाहेर यायची शक्यता आहे. काल शुक्रवारी या डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .