बीड : आता मराठा समाज बांधवांचा संयमाचा बांध फुटलाय म्हणूनचं शंभर टक्के आरक्षणासाठीचा मोर्चा निघणार आहे, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. तर हा मोर्चा मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा या नवीन नावाने निघणार आहे, असंही मेटे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, बीडमध्ये 5 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंबंधी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
ते पुढे म्हणाले, की राज्य सरकारच्या मनात पाप आहे, त्यामुळे ते समाजासाठी काहीही निर्णय करायला तयार नाहीत. सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.आता आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही.पण त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना निदान इतर सुविधा तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतात काम करतच आयुष्य काढायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत समाजाच्या प्रगतीसाठी मराठा समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील मेटे यांनी केले.
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आवाज घुमणार आहे.बीडमधून राज्यातील पहिल्या संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे. यासाठी मराठा नेते विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध नेते आणि पदाधिकारी आता मोर्चाची तयारी करताना पाहायला मिळत आहेत.
बीडच्या कपिलधार येथे मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटना ची बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 5 जूनला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढायचा हा निर्णय अंतिम झालाय. हा मोर्चा 5 जून रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला जाणार आहे.यावेळी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून हा मोर्चा काढला जाईल.सोशल डिस्टन्स पाळला जाणार असून वैद्यकीय सुविधा देखील मोर्चा दरम्यान राहणार आहेत.
दरम्यान मराठा समाजाला न्याय मागणारा हा मोर्चा असेल,हा मोर्चा सर्व, पक्ष, गट, तटाच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन काढला जाणार आहे.सर्व पक्षाचे मराठा नेते या मोर्चात येऊ शकतात.हा मोर्चा आता मुकमोर्चा नसून बोलणारा असेल, असा इशारा देखील विनायक मेटे यांनी दिलाय.