मुंबई : सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षांबाबत आज केंद्र आणि राज्यातील मंत्र्याची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीनंतर, 'विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ' , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिवाय, उच्चस्तरीय बैठकीमध्ये बारावी सीबीएसई परीक्षेबाबत निर्णय घेताना जर या परीक्षा पुढील महिन्यात घेण्याबाबत विचार असेल तर पुढील महिन्यात राज्यातील कोरोना परस्थिती पाहून परीक्षाबाबत विचार राज्यांना करावा लागेल. यामध्ये बारावीचे विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून अभ्यास करत असताना त्यांच्या मानसिकता विचारात घेऊन सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. कारण परीक्षेबाबत विद्यार्थी खूप संभ्रमात आहे, त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. शिवाय, विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत सुद्धा पुढाकार घेतला जावा, असं मत वर्षा गायकवाड यांनी बैठकीत मांडलं. राज्य मंडळाच्या दहावी बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय लवकरच घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.
राज्य मंडळाच्या दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्षण विभाग ठाम?
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मुल्यमापन अशी मागणी होतेय पण आम्ही कोर्टात सर्व म्हणणं मांडू. दहावीच्या मुलांचं नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून तो हायकोर्टासमोर ठेवू. असाधारण परिस्थितीत न्यायालय सुद्धा या सर्वाचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मुलांचं अॅडमिशन वेळेवर व्हावं असे प्रयत्न करत आहोत. एका आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, अशी आशा आहे. मुलांचं हित समोर ठेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.