Vinayak Mete : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, मराठा आरक्षण लढ्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहिलेल्या विनायक मेटे यांच्या अकाली अपघाती मृत्यूने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अपघाती निधनावर अनेक नेत्यांनी संशय घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे. बीडहून मुंबईच्या दिशेने येत असताना एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. 


विनायक मेटे यांचा मराठा आरक्षणासह नेहमीच सामाजिक लढ्यांमध्ये अग्रणी राहिले. त्यांचा सामूदायिक विवाह सोहळ्यासाठी दिलेला लढाही तितकाच लक्षात राहणारा आहे. 


सामूदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली 


विनायक मेटे यांनी सामूदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडून न थांबता स्वत:चा विवाहही त्यांनी सामूदायिक विवाह सोहळ्यातून करत एक अध्याय लिहिला होता. विनायक मेटे ज्या बीड जिल्ह्यातून येतात त्या ठिकाणी कष्टकरी वर्गाचा सर्वाधिक भरणा आहे. त्यामुळे गोरगरीब शेतकरी, ऊसतोड मजुरांच्या लेकरांची विवाह करताना होणारी परवड त्यांनी पाहिली होती. त्यामुळे मुलीच्या लग्नानंतर कर्जबाजारी होणारा बाप पाहून त्यांनी सामूदायिक विवाह सोहळ्याची चळवळ उभी केली.


स्वत:चा विवाह सामूदायिक विवाह सोहळ्यात केला


सामूदायिक विवाह एक लोकचळवळ व्हावी यासाठी त्यांनी स्वत:हून सामूदायिक विवाह सोहळ्यात विवाह केला होता. जेणेकरून इतरांना यातून प्रेरणा मिळेल. विनायक मेटे यांनी ही पायंडा मांडल्यानंतर राज्यातही या संकल्पनेचा स्वीकार केला गेला. त्यामुळे सामूदायिक विवाह सोहळ्याची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली, असे म्हणायला हरकत नाही. 


त्यांनी दाखवलेल्या मार्गातून अनेकांचे संसार जोडले गेलेच, पण सामूदायिक सोहळे आयोजित करताना त्यामध्ये खंड पडणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळे एक प्रकारे अनेक लेकींच्या गरीब बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होऊ न देण्यात विनायक मेटे यांचा खारीचा वाटा आहे यात शंका नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या