शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थानाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पेहरावात यावे असे आवाहन केलं आहे. तसे फलकही साईमंदिर परिसरात लावण्यात आले. या फलकावरून वाद निर्माण झाला आणि तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन फलक काढणार असल्याचा इशारा दिला. त्यानंतर आता शिर्डी ग्रामस्थ संस्थानच्या पाठीशी उभे राहणार असून सर्व व्यावसायिक आपापल्या दुकान अथवा हॉटेलसमोर असेच आवाहन करणारे फलक लावणार आहे. त्यामुळे आता शिर्डी ग्रामस्थ व तृप्ती देसाई या नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आता फलक वादात ग्रामस्थांनी उडी घेत साई संस्थानला अनोख्या पद्धतीने पाठींबा देणार आहेत. शिर्डीतील सर्व व्यावसायिक आपल्या दुकानांसमोर भक्तांना आवाहन करणारे फलक लावणार आहे. याची सुरुवात आज करण्यात आली असून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे. संस्थान जरी अनेकदा ग्रामस्थांच्या विरोधात निर्णय घेत असले तरी मी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेसोबत राहणार असल्याचं विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, ड्रेसकोड फलकाचा वाद चिघळण्याची शक्यता


दरम्यान संस्थानच्या या आवाहनास मनसेने पाठींबा दिला आहे. मनसेच्या वतीने शिर्डीतील हॉटलेसमोर संस्थानच्या आवाहनास साधर्म्य असलेले फलक लावत तृप्ती देसाईं शिर्डीत आल्यास आणि फलकास हात लावल्यास मनसे स्टाईनेने उत्तर देवू असा इशारा दिला आहे. संस्थानच्या ड्रेसकोड बाबत फलकास ग्रामस्थ, भाजप, शिवसेनेने पाठींबा दर्शवल्यानंतर मनसेने देखील यात उडी घेतली आहे. त्यामुळे तृप्ती देसाई 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा प्रयत्न करतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


Trupti Desai : 'शिर्डीतला ड्रेसकोडबाबतचा बोर्ड नाही काढला नाही तर...', तृप्ती देसाईंचा इशारा