मुंबई : रक्षक पुरवणा-या एका कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमित चांदोलेंची रवानगी पुन्हा एकदा तपासयंत्रणेच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीनं यासंदर्भात दाखल केलेली याचिका स्वीकारत मुंबई उच्च न्यायालयानं 29 नोव्हेंबर रोजी चांदोले यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश रद्द सोमवारी रद्द केला. तसेच मुंबई सत्र न्यायालयाला यावर तातडीनं सुनावणी घेत नव्यानं आदेश देण्याचे निर्देश जारी केले. त्यानुसार दुपारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत अमित चांदोले यांनी 9 डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा ईडीच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केले.


ईडीनं ताब्यात घेतलेल्या अमित चांदोले यांची केवळ तीन दिवसांची कस्टडी मिळाल्यानं याप्रकरणी त्यांची चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत याप्रकरणातील पुढील धागेदोरे सापडणार नाहीत. असा दावा करत ईडीनं सत्र न्यायालयानं रिमांड नाकारल्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे सुनावणी झाली. शुक्रवारी यावरील आपला निकाल राखून ठेवलेला निकाल हायकोर्टानं सोमवारी सकाळी जाहीर केला.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे चांदोले यांना ईडीनं 25 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतलं होतं. पहिल्या रिमांडमध्ये त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत ईडी कस्टडी देण्यात आली. मात्र दुस-याच सुनावणीत त्यांचा पोलीस रिमांड वाढविण्यास न्यायालयाने नकार दिला देत चांदोलेंना 14 दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत पाठवलं. या प्रकरणात कागदपत्रे आणि व्यवहार तपासाचे आहेत. हवालाबाबत चौकशी करायची आहे, त्यामुळे आरोपीचा आणखीन रिमांड हवा आहे, असा युक्तिवाद ईडिकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. मात्र चांदोलेंच्यावतीनं या आरोपांचं खंडन करण्यात आलं होतं. विशेष न्यायालयात योग्य ती कागदपत्रे दाखल न केल्यामुळे ईडीची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. आता पुन्हा रिमांड केवळ शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अडकविण्यासाठी मागितला जात आहे, असा दावा चांदोले यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी हायकोर्टात केला. सरनाईक यांचे आर्थिक व्यवहार चांदोलेंना काय माहिती?, ते काही त्यांचे सीए नाहीत. असा दावा चांदोलेंच्यावतीनं युक्तिवादात करण्यात आला होता.


साल 2014 मध्ये एमएमआरडीएच्या सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने केली आहे. याप्रकरणात सरनाईक कुटुंबियांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहे.