सांगली : खासदार राजू शेट्टी यांच्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेसाठी गावागावातुन पाठिंबा मिळताना दिसत आहे. पदयात्रेमधील कार्यकर्त्याच्या शिदोरीची जबाबदारी जिल्हातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पदयात्रेत भाकरी व खरडा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पुणे ते मुंबई या आत्मक्लेश पदयात्रेतील यात्रेकरूंना शिदोरी पुरवण्याचे काम सांगली जिल्ह्यातील गावागावातून केलं जात आहे. या पदयात्रेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी 10 हजार भाकरी जमवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पलूस तालुक्यातील अंकलखोप आणि शेजारील काही गावातील नागरिकांनी मिळून या पदयात्रेसाठी प्रत्येक घरातून दोन-दोन भाकऱ्या कार्यकर्त्यांकडे दिल्या. पदयात्रा संपेपर्यत हे भाकरी पुरवण्याचे काम चालू राहणार आहे.

शेतकरी कर्जमाफी आणि सरकारच्या विरोधात निघालेल्या या यात्रेत सहभागी होण्याची तशी गावातील प्रत्येकाची इच्छा होती. पण काहींनी पदयात्रेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शिदोरीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत या यात्रेत आपला खारीचा वाटा उचलला. जे पदयात्रेत चालण्या इतकच महत्वाचं होतं.

एक एक रुपया शेतकऱ्यांमधूनच गोळा करुन खासदार झालेले राजू शेट्टी आज आपल्याच सरकारच्या कारभारावर नाराज होऊन आत्मक्लेश करत आहेत. पण या ही वेळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले कार्यकर्त दिसत आहेत.