जळगाव : रेल्वे प्रवासात चोरीला गेलेलं सामान प्रत्येकाला मिळेलच असं नाही. जळगावमध्ये राहणारा एक प्रवासी मात्र याबाबतीत सुदैवी ठरला आहे. सचिन सोमवंशी यांना तब्बल 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली बॅग परत मिळाली आहे. 16 ऑगस्ट 2007 ला चोरीला गेलेली ही बॅग सापडली आहे.


दहा वर्षांपूर्वी सोमवंशी यांची बॅग जळगावला येत असताना मनमाड रेल्वे स्थानकाजवळ चोरीला गेली होती. याची तक्रार सोमवंशी यांनी भुसावळमध्ये केली. मात्र कित्येक वर्ष बॅग संदर्भात कोणतीच माहिती न मिळाल्यानं सोमवंशी यांनी बॅग परत मिळण्याची आशाच सोडून दिली होती.

पोलिसांना ही बॅग काही वर्षांपूर्वीच मिळाली होती. मात्र चोरट्याकडून सामान हस्तगत करुन त्याला कोर्टात नेलं. त्यानंतर कोर्टानं रेल्वे पोलिसांना ही बॅग सोमवंशी यांना परत करण्याचे आदेश दिले आणि अखेर 10 वर्षांनी ही बॅग त्यांच्या सर्व सामानासकट सोमवंशी यांच्याकडे सुपूर्द केली.

या घटनेने सर्व सामान्यांचा पोलिस आणि न्याय यंत्रणेवरचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.