Maratha Reservation Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बहुमत नाही तर एकमत म्हणावे, असे म्हटले. त्यामुळे मराठा विधेयक राज्य मंत्रिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केली. 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठ्यांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणामागील भूमिका मांडली. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. 


बहुमत म्हणू नये, एकमत म्हणावे - विजय वडेट्टीवार


यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर कुणाचाही विरोध होण्याचे कारण नाही. आरक्षण मिळायला हवे ही आमची सगळ्यांची भूमिका होती. त्यामुळे याला बहुमत म्हणू नये, एकमत म्हणावे, असे म्हटले आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला.


हे फसवं सरकार


विजय वडेट्टीवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना दिले होते. मुख्यमंत्री यांनी आमच्या प्रश्नाला बगल दिली. आतापर्यंत दोन वेळा आरक्षण दिले पण ते टिकू शकले नाही. हे फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा सरकारने समाजाची फसगत केली आहे. 10 टक्के आरक्षण देत असताना याला ठोस आधार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


कायद्यात टिकणारे आरक्षण नाही


ते पुढे म्हणाले की,  हे कायद्यात टिकणारे आरक्षण नाही. यांना निवडणूक काढून घ्यायची आहे. मागे झालं तसच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मत घेण्यासाठी सरकारने हे फसवं काम केले असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. 


काय म्हणाले राज ठाकरे?


मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे. मात्र, याचा कितपत फायदा होईल, याचा विचार मराठा समाजानं करावा, मराठा समाजानं जागरूक राहावं, कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. 


आणखी वाचा


Maratha Reservation Bill: मराठा आरक्षण कधीपासून लागू, कुठे कुठे आरक्षण, OBC मधून का नाही?, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं!


Manoj Jarange Patil : अधिवेशनात अध्यादेशावर निर्णय नाहीच, जरांगे आक्रमक; सलाईन काढून फेकलं, उपचारही बंद